राम गणेश गडकरी रंगायतन म्हणजेच गडकरी रंगायतन सांस्कृतिक राजधानी असलेल्या ठाणे (महाराष्ट्र) अगदी मध्यवर्ती भागात स्थित आहे. ठाणे शहरातील नावाजलेल्या “मासुंदा तलाव” म्हणजेच तलावपाळी जवळच ही वास्तू स्थित आहे. ठाणे स्थानक येथून अगदी १० ते १५ मिनिटांत चालत आपण या नाट्यगृहाजवळ पोहोचू शकतो.
इतिहास :
या नाट्यगृहाची स्थापना १५ मे १९७८ रोजी झाली असून या इमारतीचे बांधकाम ठाणे महानगरपालिकेने (Thane Municipal Corporation) केले. या वास्तूचे वास्तुविशारद श्री. वसंत पानसरे हे होते, ज्यांनी ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडियम व ठाणा कॉलेज सारख्या भव्य वास्तूंचे स्थापत्य कलेने बांधकाम साकारले होते. या वास्तूचे भूमिपूजन नटवर्य मामा पेंडसे यांच्या शुभहस्ते झाले व उद्घाटन ज्येष्ठ साहित्यिक पु. ल. देशपांंडे व हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले. या कार्यक्रम सोहळ्यात अनेक दिग्गज साहित्यिक, अभिनेते व राजकीय व्यक्तिमत्व हजर होती.
या नाट्यगृहात सर्वप्रथम “मृगतृष्णा” हे व्यावसायिक नाटक सादर करण्यात आले होते. या नाटकाची निर्माती संस्था ‘चंद्रलेखा’ ही होती. या संस्थेचे मालक मोहन वाघ हे होते.
या नाट्यगृहात वर्षाला साधारणतः १००० प्रयोग होतात. या नाट्यगृहाची आसन क्षमता साधारणपणे ११०० इतकी आहे.
या वास्तूत भव्य अशी तिकीट खिडकी आहे. नाट्यगृहाच्या आत प्रवेश करण्यासाठी रसिकप्रेक्षकांसाठी एक वेगळं प्रवेशद्वार व कलाकार मंडळींसाठी एक वेगळं प्रवेशद्वार आहे. नाट्यगृहाच्या खाली एक स्वच्छ उपहारगृह आहे. दुचाकी व चारचाकींसाठी मर्यादित जागा उपलब्ध आहे. वास्तूत मागील बाजूस एक वातानुकूलित सराव/तालीम कक्ष उपलब्ध आहे, जिथे अनेक कार्यक्रमांची तालीम केली जाते. वरच्या मजल्यावर चार ग्रीन रूम्स व गेस्ट रूम्सदेखील आहेत. हे नाट्यगृह नाटकांकरिता मर्यादित नसून येथे अनेक संगीत मैफिली व विविध संस्थांचे कार्यक्रमदेखील होतात.
वास्तूत विशेष पहाण्यासारखे :
वास्तुकडे तोंड करून उभे राहिल्यावर उजव्या बाजूला वास्तूवरच एक मोठं शिल्प कोरलेलं आपल्या दृष्टीस पडतं. त्या शिल्पात त्रिमूर्ती दिसतात, त्यातील खालच्या बाजूस जे दिसतात ते राम गणेश गडकरी वरच्या डाव्या बाजूला बळवंत पांडुरंग किर्लोस्कर (अण्णासाहेब किर्लोस्कर) हे असून उजव्या बाजूला नारायण श्रीपाद राजहंस (बालगंधर्व) हे आहेत.
सध्या नुकतेच काही वर्षांपूर्वी येथे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे पवित्र स्मारक बांधण्यात आलेले असून रोज संध्याकाळी याची शोभा डोळ्यांना दिपवून टाकते.
ठाण्यात येऊन जर हे नाट्यगृह पाहिले नाही तर तुम्ही ठाणे शहर पूर्णतः पाहिलं नाही असं म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
पत्ता : डॉ. मूस पथ , तलावपाली जवळ, ठाणे (पश्चिम) ४००६०१
संपर्क : ०२२ २५३६२१६५.
— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक,लेखक)
Leave a Reply