रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)

  1. बालगंधर्व रंगमंदिर, पुणे
  2. गडकरी रंगायतन, ठाणे
  3. मुंबईची शान असलेला मेट्रो सिनेमा
  4. शिवाजी मंदिर, दादर, मुंबई
  5. रविंद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी (दादर – मुंबई)
  6. कॅनडातील ९० वर्षे जुना रॉक्सी सिनेमा

मुंबई ! सगळ्यांची लाडकी, सगळ्यांना स्वत:मध्ये समावून घेणारी आई तशीच आर्थिक राजधानी. या नगरीबद्दल कोणाला जर आकर्षण वाटलं नाही तर नवलच. ही नगरी विविधतेने नटलेली असून या नगरीत बर्‍याच वास्तू पहाण्यासारख्या आहेत. त्यापैकीच एक म्हणजे सध्याच्या पु.ल.देशपांडे महाराष्ट्र कला अकदमीच्या आवारात उभे असलेले हे “रविंद्र नाट्यमंदिर”.

नाट्यगृह, अगदी सिद्धीविनायक मंदिर, प्रभादेवी येथुन हाकेच्या अंतरावर स्थित आहे. हे अगदी मध्यवर्ती ठिकाण आहे असं म्हटल्यास वावगं ठरणार नाही. नाट्यगृह सगळ्यांच्या लगेच ध्यानात येईल असे रस्त्याला लागूनच आहे. नाट्यगृहात प्रवेश करण्यासाठी दोन प्रवेशद्वार आहेत. मुख्य प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर उजव्या बाजूस छोटेखानी तिकिट घर आहे. येथे शक्यतो नकद देऊन अथवा ऑनलाईन तिकिट खरेदी करता येते. मर्यादित वाहनांसाठी वाहनतळ उपलब्ध आहे. साधारणत: ४० ते ५० वाहनं येथे सहज उभी करता येतात.

नाट्यगृहाच्या आवारातच एक मुख्य व एक मिनी नाट्यगृह आहेत. त्यातील मुख्य नाट्यगृहाची आसन क्षमता ९११ इतकी असून मिनी नाट्यगृहाची आसन क्षमता १९९ इतकी आहे. हे नाट्यगृह फक्त नाटकांपुरतं मर्यादित नसून इतर अनेक सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रम या नाट्यगृहात सातत्याने चालू असतात. येथे विशेषत: मराठी तसेच गुजराती नाटकांचे प्रयोग होतात. येथे ४ ड्रेसींग रूम उपलब्ध आहेत.

अकादमीच्या आवारातच एक हॉटेल आहे. होणार्‍या कार्यक्रमांकरिता, नाटकांच्या तालमींंकरिता, मिटींगस्, सेमिनार्स यांच्याकरिता वेगवेगळे सुसज्जित कक्ष उपलब्ध आहेत.

येथील मुख्य नाट्यगृहाच्या रंगमंचाचा आकार ३०’ *  ६०’ इतका आहे. ही वास्तू ९९२४.५७ चौरस फूट इतक्या भव्य जागेवर स्थित आहे. मिनी नाट्यगृहाचे आकारमान साधारणत: ५० चौरस मीटर इतके आहे.

वास्तूत विशेष पहाण्यासारखे

तिकीट घराकडून नाट्यगृहाच्या आत प्रवेश करतेवेळी समोरच ध्यानस्थ रविंद्रनाथ टागोर यांचा पुतळा लक्ष वेधून घेतो. जर दुसर्‍या प्रवेशद्वारातून प्रवेश केला तर समोरच एका भव्य जागेत महराष्ट्राचे लाडके साहित्यिक पु.ल.देशपांडे यांचा उभा पूर्णाकृती पुतळा शोभा वाढवतो. त्याला लागूनच एक आणखीन कोरीव शिल्प आपलं ध्यान हेरुन घेतं आणि ते शिल्प म्हणजे लहानपणी मराठी विषयाच्या पुस्तकावर असलेले “बालभारतीचे” शिल्प. वास्तूच्या वरील मजल्यावर एक आर्ट गॅलेरी आपल्याला खूणावू लागते. पुढे वास्तूतील  २ प्रदर्शन कक्ष पाहिल्याशिवाय आपल्याला रहावत नाही. या कक्षात नेहमी वेगवेगळे कलाकार आपल्या चित्रांची, छायाचित्रांची प्रदर्शनंं भरवित असतात.

एकंदरीत ही वास्तू मुंंबई नगरीचे वैभव स्वत:मध्ये प्रतिबिंबीत करते असंं ठामपणे म्हणता येईल.

पत्ता: श्री सिद्धीविनायक मंदिराजवळ, सयानी पथ , दादर प्रभादेवी, मुंंबई – ४०००२५

संपर्क : ०२२ २४३१२९५६/०२२ २४३६५९९०

— आदित्य दि. संभूस (कलाकार, दिग्दर्शक, लेखक)

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*